फर्ग्युसन महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. २१: जिल्हा जात पडताळणी समितीच्यावतीने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहीमेबाबत माहिती देण्यासाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचे असल्याने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेमधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये पुणे यांनी दिले आहेत. त्यानुसार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत जात वैधता प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र कार्यपद्धती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून मुळ प्रस्ताव जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
कार्यशाळेला जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव संतोष जाधव, प्रकल्प अधिकारी, किर्ती शेलार, फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर प्राप्त व्हावेत यासाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गंत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पॅटर्नच्याधर्तीवर पुणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात समतादूत, गृहपाल यांच्यामार्फत प्रत्यक्ष महाविद्यालय, विद्यार्थी, पालक तसेच समान संधी केंद्रांच्या समन्वयातून विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा