रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

  

पुणे,दि. २३ : नैसर्गिक आपत्ती, किडी व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्याला विमा संरक्षण देणे आणि नुकसानीच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.


प्रधानमंत्री पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. 


या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी बागायत व जिराईत या पीकांसाठी अंतिम मुदत ३० नाव्हेंबर आहे. बागायत ज्वारीसाठी प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३३ हजार रुपये, जिराईत ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम ३१ हजार आहे. बागायत गहू पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रुपये, हरभरा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, रब्बी कांदा पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये असून या तिन्ही पिकांसाठी १५ डिसेंबर पर्यंत विमा हत्पा भरुन सहभागी होता येणार आहे. उन्हाळी भूईमुग पीकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये असून ३१ मार्च २०२३ पर्यंत सहभागी होता येणार आहे.


 शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी विमा कंपनी आय.सी.आय.सी.आय. जनरल लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, customersupportba@icicilombard.com या इमेल पत्त्यावर तसेच नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था, कृषि विभागाचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, पुणे, खेड, बारामतीचे उपविभागीय कृषि अधिकारी, जवळचे नागरीक सुविधा केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात