अतिवृष्टीमुळे पिंकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १८ लाख रुपयांचे निविष्ठा अनुदान वितरीत ; जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना दिलासा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / चंद्रकांत सलवदे

पुणे, दि. १८: अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हे. ८५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य शासनाच्यावतीने निविष्ठा अनुदान म्हणून एकूण ३ कोटी १८  लाख ४५ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.


जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये २ हजार १७९ हे. ५ आर वरील जिरायती पिके, ३२ हे. ६५ आर क्षेत्रावरील बागायती पिके तर ३६ हे. १५ आर क्षेत्रावरील बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नियमानुसार निधीची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीदेखील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. 


नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तिंना केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) मदत देण्यात येते.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर राज्य शासनाकडून १३ मे २०१५ च्या महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार  लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ३३ टक्के वा त्यापेक्षा अधिक झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टरी निविष्ठा अनुदान जिरायती पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येते. 


मात्र अतिवृष्टीने झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय २२ ऑगस्ट २०२२ रोजी जारी केला. त्यानुसार जिरायत पिकांसाठी १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकांसाठी २७ हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये इतकी मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेण्यात आला.


राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे १ जून ते ऑगस्ट अखेरच्या पिकांच्या नुकसानीबाबत अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार १ कोटी ५९ लाख २२ हजार रुपये प्राप्त झाले. दरम्यान वाढीव दराने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर फरकाची रक्कम १ कोटी ५९ लाख २३ हजार रुपये प्राप्त झाली असून याप्रमाणे एकूण ३ कोटी १८ लाख ४५ हजार रुपये अशी सर्व रक्कम तालुक्यांना वितरीत करण्यात आली आहे. वितरीत करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.


*तालुका निहाय बाधित शेतकरी, बाधित क्षेत्र तसेच एकूण वितरीत अनुदान:*

भोर- ३४ शेतकरी ८.६२ हे.आर., १ लाख २३ हजार ५८० रुपये, वेल्हा- ४ शेतकरी ०.६० हे.आर., २१ हजार ६०० रुपये, मुळशी- ९ शेतकरी २.२० हे.आर., २९ हजार ९२० रुपये, मावळ- ३६१ शेतकरी ३३.९३ हे.आर.,४ लाख ६१ हजार ४४८ रुपये, खेड- १ हजार १६४ शेतकरी २५९.८ हे.आर.,३७ लाख २८ हजार २३० रुपये, आंबेगाव- १ हजार ६८५ शेतकरी २५३.०७ हे.आर., ३६ लाख २६ हजार १४ रुपये, जुन्नर- ५ हजार ६३५ शेतकरी १६२२.२६ हे.आर., २ कोटी २० लाख ६२ हजार ७३६ रुपये, शिरुर- ४९ शेतकरी ९.३५ हे.आर., २ लाख ८ हजार ९०० रुपये, पुरंदर- १६७ शेतकरी २२.४७ हे.आर., ३ लाख ५ हजार २९२ रुपये, बारामती- २ शेतकरी १.१७ हे.आर., ४२ हजार १२० रुपये, इंदापूर- ८२ शेतकरी ३४.३१ हे.आर., १२ लाख ३५ हजार १६२ रुपये.


*जिल्हाधिकाऱ्यांकडून परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा*

सोमवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतपिकांचे नुकसान झाले. तसेच बारामती तालुक्यात नदीला पूर आल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवस काही भागात पावसाची शक्यता असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क रहाण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात