विनाअनुदानित शिक्षकांचा महाएल्गार ला हवी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट अनुदानासाठी आझाद मैदानावर आंदोलन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / दत्ता भगत
मुंबई : ‘माझा पगार माझी जबाबदारी त्यासाठी शेवटची मुंबई वारी', आझाद मैदान मुंबई येथे १० ऑक्टोंबर पासून महाएल्गार बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार शिक्षक समन्वय संघाच्या शिक्षकांनी केला आहे. आम्ही आमदारांच्या मंत्र्यांच्या पाया पडलो, मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले, पण सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. आमचा वनवास काही संपत नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही हे आमचे दुर्भाग्य आहे. अशी व्यथा ऑक्टोबर हिटच्या रणरणत्या उन्हात महाआक्रोश आंदोलन पुकारणाऱ्या शिक्षकांनी जनलोक वार्ताशी बोलताना आपली भावना व्यक्त केली. राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यातील ६५००० विना आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून २०१४ व नोव्हेंबर २०१५ वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानात बेमुदत महाआक्रोश आंदोलन पुकारले आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही या निर्धाराने आंदोलन सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन सुरू असते. त्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांचे प्रतिनिधी हे आमदार व मंत्र्यांच्या भेटी घेतात. शिक्षकांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे, पण अजूनपर्यंत सरकारने या शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. सहाशेहून अधिक शिक्षक या महाआक्रोश आंदोलनात सहभागी झालेले आहेत. ऑक्टोबरच्या रणरणत्या उन्हात शिक्षक आझाद मैदानात ठिय्या देऊन आहेत.
यासंदर्भात अघोषित शिक्षक महासंघ या शिक्षकांच्या संघटनेचे निमंत्रक बबन पाटील येवले यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मागील महिन्यात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांनी आमच्या मागण्यांचा प्रश्न शिक्षणमंत्र्यांकडे सोपवला. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी आम्हाला मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ
मागितला. आम्ही तो दिला, पण आता परत त्यांनी मुदत वाढवून मागितली आहे. त्यामुळे आम्हाला आता शिक्षकमंत्र्यांना भेटायची इच्छा नाही. आता आम्हाला मुख्यमंत्र्यांचीच भेट हवी आहे. आम्ही आमदारांच्या पाया पडलो, पण आमची कोणी दखल घेत नाही, अशी शिक्षकांची व्यथा असल्याचेही बबन पाटील येवले यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा