महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायाभिमुख अणि आनंददायी असावे- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / विजय कानवडे



पुणे दि.१७- महाविद्यालयीन शिक्षण व्यवसायाभिमुख, बहुश्रुत व्यक्तिमत्व घडविणारे आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करताना आनंदही देणारे असावे. विद्यार्थ्यांला शिक्षणामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या आवडीचे शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक सत्र २०२२२३ पासून सी.बी.सी.एस. प्रणालीनुसार नवीन अभ्यासक्रम सर्व विद्याशाखेत लागू केला असून त्याबाबत विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांतील नियमित व तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याकरीता एकदिवसीय ‘मास्टर ट्रेनींग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापकांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. 


मंत्री श्री.पाटील म्हणाले, एकाच अभ्यासक्रमात विविध प्रकारचे शिक्षण घेण्याची सुविधा विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे. त्यातूनच विद्यार्थ्याचे सर्वांगिण व्यक्तिमत्व विकसीत होऊ शकेल. नवे शैक्षणिक धोरण प्राध्यापकांना पुढे न्यावयाचे असल्याने त्यांनी मोकळ्या मनाने याविषयावर विचारमंथन करावे आणि हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात रुची घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ७५ हजार प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


नवै शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही श्री.पाटील यांनी दिली. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करून ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी विद्यापीठांना शासनाचे सर्व सहकार्य राहील. तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांची पुस्तके मराठीत करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजीतील अभ्यासक्रम समजून घेण्यास मदत मिळेल. विद्यार्थ्यांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोहोचविण्यासाठी मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरावा लागेल, असेही मंत्री पाटील म्हणाले. महाराष्ट्रात सी.बी.सी.एस. प्रणाली लागू करणारे पहिले विद्यापीठ असल्याबद्दल त्यांनी अमरावती विद्यापीठाचे अभिनंदन केले.


*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा*

राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक विकासासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली जात असून भारताचा नवयुवक सर्वज्ञानी, विविध कौशल्याने युक्त आणि स्वावलंबी होण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण उपयुक्त असल्याचे त्यांनी संदेशात सांगितले.


अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या संदेशात सर्व विद्याशाखेत सी.बी.सी.एस. लागू केल्याबद्दल विद्यापीठाचे कौतुक केले.


प्रधान सचिव डॉ. विकास चंद्र रस्तोगी म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात ज्ञान, विज्ञान, कौशल्य आणि संस्कृतीचा संगम आहे. शिक्षकांना प्रशिक्षित करुन नवीन शैक्षणिक धोरण व अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थीकेंद्रीत घटकांपर्यंत पोहोचवायची आहे. नवतरुणांना आपल्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य नव्या पद्धतीत असल्याने गुणवत्तापूर्ण, कौशल्यपूर्ण, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यास मदत होईल.  


कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, एच.आर.डी. केंद्राचे संचालक डॉ. प्रसाद वाडेगांवकर, अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात