लम्पी त्वचा रोगासंदर्भात बाधित व निगराणी क्षेत्र घोषित
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / राजू शिंगाडे
पुणे, दि. ८: जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीऐंदी व भरतगांव, जुन्नर तालुक्यातील मौजे मांजरेवाडी (खोडद), शिरुर तालुक्यातील मौजे गोलेगाव आणि खेड तालुक्यातील मौजे करंजविहिरे या गावांमध्ये जनावरांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग झाला असल्याने प्राण्यांच्या संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहे.
प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नियम १२ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन वरील पाचही गावापासून १० किलोमीटर परिघातील क्षेत्रामध्ये बाधित व निगराणी क्षेत्रामधील जनावरांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आली आहे. बाधित व अबाधित पशुधनास आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा