कृषी निविष्ठा विक्री परवाना नूतनीकरणासाठी विक्रेत्यांना निविष्ठांबाबत अभ्यासक्रम बंधनकारक
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी
पुणे, दि. ८: कृषी विषयक पदवी किंवा पदविका शैक्षणिक अर्हता नसलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी निविष्ठांबाबतचे अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही, असे आत्माचे प्रकल्प संचालक आर. डी. साबळे यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच कृषी निविष्ठा विक्रेत्याकडे कृषी विषयक पदवी किंवा पदविका शैक्षणिक अर्हता नाही. त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनानुसार अशा विक्रेत्यांनी वेळेत ३ अभ्यासक्रमापैकी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे.
सर्व परवाने असून शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्याकरिता कृषी पदविका अभ्यासक्रम (‘देसी’ अर्थात ‘डीएईएसआय’- डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्टें्यशन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स) पूर्ण करणे अनिवार्य आहे. फक्त खताचा परवाना आहे अशा परवानाधारकांनी केवळ ‘सीसीआयएनएम- सर्टिफिकेट कोर्स ऑन इंटिग्रेटेड न्युट्रिएन्ट मॅनेजमेंट फॉर फर्टिलायझर डीलर्स’ अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. फक्त किटकनाशकांचा परवाना आहे अशांनी केवळ ‘सीसीआयएम- सर्टिफिकेट कोर्स ऑन इन्सेक्टिसाईड मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम (ऑनलाईन पद्धतीने) करणे गरजेचे आहे.
शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या खते, औषधे व बी-बियाणे अशा तिनही निविष्ठांचे विक्रेते, धारकांसाठी ‘देसी’ अभ्यासक्रम आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम १ वर्ष (४८ आठवडे- प्रत्येक रविवार किंवा आठवड्यातील एक दिवस) कालावधीचा आहे. पुणे जिल्ह्यात ‘देसी’ अभ्यासक्रम घेण्यासाठी प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), शिवाजीनगर, पुणे तसेच कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांना नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी निविष्ठा विक्रेता हा किमान १० वी उत्तीर्ण असावा व त्यांनी देसी अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहित नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन अभ्यासक्रमाशी संबंधित नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करावी.
फक्त कीटकनाशके कृषी विक्रेत्याकरिता ‘सीसीआयएम’ ऑफलाईन अभ्यासक्रम ३ महिन्याचा (१२ आठवडे - रविवार किंवा आठवडयातील एक दिवस) पूर्ण करणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात या अभ्यासक्रमासाठी बारामती तसेच जुन्नर येथील कृषी विज्ञान केंद्र, प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (रामेती) पुणे, पशुसंवर्धन महाविद्यालय बारामती, पद्मश्री अप्पासाहेब पवार कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय बारामती, ग्रामोन्नती मंडळ कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय नारायणगाव, कृषी व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नारायणगाव आणि शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे यांना नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त नाही त्या खत विक्रेत्यांनी १५ दिवसांचा ‘सीसीआयएनएम’ अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमासाठी बारामती तसेच जुन्नर येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे आणि शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे या नोडल प्रशिक्षण संस्था आहेत.
जास्तीत जास्त कृषी निविष्ठा परवानाधारकांनी आवश्यकतेनुसार नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे कार्यालय (दूरध्वनी क्र. ०२०-२५५३०४३१) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा