छत्रपती घराण्याचे वारसदार शिवाजीराजे भोसले यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / योगेश रांजणे
पाचगणी : दि.१३,छत्रपती घराण्याचे वारसदार आणि सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. पुण्याच्या जहांगिर हॅास्पिटलमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या सकाळी ९ वाजता अदालत वाडा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता अदालतवाडयापासून अंत्ययात्रा निघणार असून संगम माहूली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ रोजी झाला. सातारा शहराच्या विकासात त्यांनी मोलाची भर घातली. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. १९८५ ते १९९१ या कालावधीत ते सातारचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या काळात त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली. शहराच्या सुधारणांसाठी ते कायम आग्रही राहिले.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे गेले ७५ वर्ष साताऱ्यातील आदालत वाडा येथे वास्तव्य होते. ते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ ट्रस्टचे विशस्त होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान दिले असून परळी खोऱ्यातील आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते, त्या माध्यमांतून शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उभारणी केली. कला वाणिज्य महाविद्यालयाच्या उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान दिले होते. करंजे येथील सेवाधाम अग्नि मंदिर संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. शांत, संयमी, आणि सुसंस्कृत ही शिवाजीराजे यांची ओळख होती. ते अतिशय साधेपणाने जीवन जगले, तळागळातल्या सामान्य माणसांशी ते प्रेमाणे वागत , प्रत्येकाला नावानिशी ओळखायचे ही त्यांची वेगळी ओळख होती. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी मित्र परिवार जपला होता. अनेकानां सामाजिक आणि राजकिय सर्वोच्च पदावर नेण्याची भूमिका त्यांनी बजावली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा